क्रांतीचे अग्रदूत

कृपया शेअर करा

देशातील लोकशाही व्यवस्था एवढी बळकट का आहे या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा जेंव्हा मी प्रयत्न केला तेंव्हा मला जाणवले की, येथे आहार-विहार-विचार आदींची विविधता असली तरी लोकसत्ताक मूल्यांबाबत जनता प्रचंड जागरुक आहे. ही जागरुकता एका दिवसात आलेली नाही तर ती सततच्या विचारप्रक्रियेतून येथील समाजमनात खोलवर रुजलेली आहे. यासाठी ज्या समाजसुधारकांनी प्रयत्न केले, त्यामध्ये महात्मा जोतीबा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांचे नाव अग्रस्थानी घ्यावे लागेल. लोकसभेत मी जेंव्हा त्यांना ‘भारतरत्न’ जाहीर करण्याची मागणी केल्याचे वृत्त माध्यमांत आले, तेंव्हा त्याचे सर्वच स्तरातून स्वागत करण्यात आले. काही माणसं ही पुरस्कारांपेक्षाही मोठी असतात. फुले दांम्पत्य हे त्यापैकीच एक आहे. त्यांना ‘भारतरत्न’ जाहीर करणे म्हणजे खरेतर ‘भारतरत्न’चाच गौरव ठरणारा आहे. अर्थात त्यासाठी केंद्र सरकारने तशी मानसिकता दाखविण्याची आवश्यकता आहे.

महात्मा फुले यांच्या मृत्यूला सव्वा शतकाहून अधिक काळ लोटला आहे. त्यांनी घालून दिलेल्या सत्यशोधकी पायवाटेचा आज महामार्ग झाला आहे. पण हे सर्व करताना त्यांना त्या काळात ज्या अडचणींचा सामना करावा लागला, त्यांची आता कल्पनाही करवत नाही. कर्मठ विचारांच्या प्रवृत्तींनी त्यांच्या अंगावर अक्षरशः मारेकरी घातले. सावित्रीबाईंना तर शेण आणि दगडांचा माराही सहन करावा लागला. पण तरीही या दोघांनीही आपल्या कार्यात खंड पडू दिला नाही. ज्या काळात मुलींनी शाळा शिकणे हे पाप समजले जात असे, धर्मशास्त्रानुसार त्यांना ज्ञानार्जनाची संधी नाकारण्यात आली होती, त्या काळात त्यांनी १८४८ साली स्त्रीशिक्षण आणि दलितांच्या शिक्षणाची व्यवस्था उभी केली. शुद्रातिशुद्र समाजासाठी त्यांनी नवी दृष्टी दिली. ज्ञानाचा नवा प्रकाश त्यांनी खऱ्या अर्थाने सर्वांसाठी खुला केला. यामागील त्यांची भूमिका अगदी स्पष्ट होती. हे महात्मा फुले यांच्या पुढील रचनेतूनच लक्षात येते. फुले म्हणतात….

विद्ये विना मती गेली ।
मती विना निती गेली ।।
निती विना गती गेली ।
गती विना वित्त गेले ।।
एवढे सारे अनर्थ एका अविद्येने केले ।।

महात्मा फुले यांच्या कार्याची महतीच सांगायची असेल तर मला इतिहासातील तीन मोठ्या व्यक्ती त्यांच्याबद्दल काय विचार करायच्या ते आवर्जून सांगावे लागेल. घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे फुल्यांना गुरुस्थानी मानायचे हे सर्वश्रृत आहेच. ‘फुल्यांचा वारसा आपण कायम उराशी बाळगू ’ असे ते अभिमानाने सांगायचे. पुण्यामध्येच १९३२ साली एका भाषणात महात्मा गांधी म्हणाले होते की, ‘जोतीराव फुले देशातील पहिले आणि खरे महात्मा होते’. तर सावरकरांनी त्यांचा उल्लेख करताना ‘समाज क्रांतिकारक’ असे विशेषण वापरले आहे. हे तिन्ही नेते एका विशिष्ट विचारसरणीचे नेतृत्त्व करतात; पण जेंव्हा ते फुल्यांबाबत बोलतात, तेंव्हा मात्र त्यांचे एकमत होते. अगदी अलीकडे येऊन बोलायचं झाल्यास, प्रख्यात विचारवंत डॉ. रामचंद्र गुहा यांनी त्यांचा ‘आधुनिक भारताचे शिल्पकार’ असा उल्लेख केला आहे.

महाराष्ट्र सरकारने नुकतेच जे शाळा बंद करण्याचे फर्मान सोडले आहे, ते वाचताना १८८२ साली महात्मा फुले यांनी हंटर आयोगाकडे प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत करण्याची केलेली मागणी आवर्जून आठवते. तळागाळातील जनता जर शिक्षित व्हायची असेल तर त्यांना शिक्षणाच्या सुविधा सहज उपलब्ध होतील अशा असल्या पाहिजे, ही त्यांची भूमिका होती. त्यांची भूमिका कित्येक दशके उलटून गेल्यानंतरही समर्पक वाटते. शिक्षणाबाबत त्यांच्या भूमिका आणि धारणा अगदी पक्क्या होत्या. त्या सखोल अभ्यासाअंती तयार झाल्या होत्या. शैक्षणिक गळतीचा प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी १८५४ साली ‘प्रौढ शिक्षण अभियान’ सुरु केले होते. यामध्ये त्यांनी स्त्रीयांना शिक्षण कसे मिळेल याकडे आवर्जून लक्ष दिले होते. या सर्व कामांमध्ये सावित्रीबाई फुले यांनी महात्मा फुले यांना केवळ साथच दिली नाही तर त्यांच्या पश्चात आपल्या दत्तक मुलास सोबत घेऊन त्यांचे कार्य पुढे सुरुच ठेवले. यातून जी कार्यनिष्ठा दिसते तिला तोड नाही.

पुण्यातील भिडेवाड्यात सुरु केलेल्या मुलींच्या पहिल्या शाळेतील शिक्षिका सावित्रीबाई फुले याच होत्या. त्या जेंव्हा शिकविण्यासाठी जात तेंव्हा सनातनी विचारांचे गावगुंड त्यांना अर्वाच्च्य भाषेत शिवीगाळ करीत. त्यांच्या अंगावर शेण-दगड फेकून मारत. परंतु सावित्रीबाई डगमगल्या नाहीत. जोतीबांनी दाखवून दिलेल्या वाटेवरुन त्या चालत राहिल्या. जर त्या वाटेवरुन सावित्रीबाई माघारी फिरल्या असत्या, तर स्त्रीशिक्षणाची पहाट उजाडण्यासाठी आणखी किती शतके वाट पहावी लागली असती, याची कल्पनाही करवत नाही. फुल्यांच्या या शाळेत शिकणाऱ्या मुक्ता साळवे या विद्यार्थिनीने ‘मांगा महारांच्या दुःखा’विषयी लिहिलेल्या निबंधातून शिक्षणाचा प्रकाश वंचितांच्या अंधारविश्वात पडल्यानंतर त्यांच्या जाणीवांना कसे शब्द आले हे स्पष्ट होते. त्यानंतर स्रीवादी लेखिका ताराबाई शिंदे, पहिली स्त्री संपादक तान्हुबाई बिर्जे अशा विद्यार्थिनी पुढे उदयास आल्या. त्यांच्या साहित्याची खोली पाहिली तर फुल्यांच्या विचारांची उंची सहज लक्षात येईल.

शेतकऱ्यांच्या समस्यांची मांडणी करण्यासाठी त्यांनी लिहिलेले ‘गुलामगिरी’ हे पुस्तक आजही शेतकरी चळवळींसाठीच नव्हे तर संपुर्ण देशासाठी मार्गदर्शक असेच आहे. इंग्लंडचा राजकुमार ‘ड्यूक ऑफ कॅनॉट’ समोर देशातील जनतेचे खरे चित्र दाखविण्यासाठी शेतकऱ्याचा वेश परिधान करुन ब्रिटीश सत्तेला ही स्थिती बदला, असे सांगणारे महात्मा फुलेच होते. शेतकऱ्यांच्या कष्टाची, व्यथांची त्यांना जाणीव होती. कारण ते स्वतः प्रगतीशील शेतकरी होते. शेतीमालाला उत्पादन खर्च भरून येऊन किमान पंधरा ते वीस टक्के नफा मिळेल एवढा बाजारभाव मिळाला पाहिजे. त्यासाठी पुरेशी सिंचनव्यवस्था असली पाहिजे. शेतीला पाणी देण्यासाठी त्याची पक्की यंत्रणा उभारली पाहिजे. शेतीला जोडधंद्याची साथ दिली पाहिजे. नैसर्गिक खते, संकरीत बियाणे वापरली पाहिजेत अशा त्यांनी ‘शेतकऱ्याचा आसूड’ या पुस्तकातून केलेल्या सूचना आजही समर्पक आहेत.

विधवांचे केशवपन करण्याची प्रथा हाणून पाडण्यासाठी त्यांनी घडवून आणलेला न्हाव्यांचा संप ही उल्लेखनिय घटना आहे. त्यापेक्षाही ज्या विधवा स्त्रिया पुरुषांच्या वासनेच्या शिकार होऊन गरोदर रहात, ज्यांना आत्महत्येचा मार्ग स्वीकारण्याशिवाय दुसरे गत्यंतर नसायचे, त्यांच्या बाळंतपणाची व्यवस्था महात्मा फुल्यांनी स्वतःच्या घरात केली. एवढेच नाही तर त्या महिला आणि त्यांच्या मुलांना खंबीर आधार दिला. या कामात त्यांच्या पाठीशी सावित्रीबाई फुले देखील ठामपणे उभ्या राहिल्या.

शतकांच्या अंधारातून प्रकाशाचा कल्लोळ बाहेर यावा त्याप्रमाणे महात्मा जोतीबा फुले आणि सावित्रीबाई फुले हे दांम्पत्य त्या काळात समाजपटलावर प्रकटले होते. जुनाट संकल्पनांना छेद देऊन नव्या संकल्पना मांडत होते. समतेवर आधारीत समाजाची निर्मिती करण्यासाठी झटत होते. जोतीबा फुले सामाजीक क्रांतीचे अग्रदूत आहेतच परंतु ते कृषीतज्ज्ञ, अभियंते, उद्योजक आणि अर्थतज्ज्ञ देखील आहेत. समाजातील सर्वांसाठी कल्याणकारी मार्ग त्यांनी आपल्या कार्यातून, वर्तनातून, साहित्यातून खुला केला. हे सर्व कार्य करताना त्यांनी घरातून सुरुवात केली. सावित्रीबाईंनाही त्यांनी आपल्या कार्यात सामावून घेतले. महिलांना पुरुषांच्या बरोबरीने वागणूक आणि अधिकार मिळाले पाहिजेत, याचा वस्तुपाठ या दोघांनाही घालून दिला आहे.

या दोघांच्याही लोकोत्तर कार्याचा यथोचित गौरव होण्याची नितांत आवश्यकता आहे. हे दोघे नसते तर कदाचित देशाच्या सर्वोच्च सभागृहात आपली भूमिका मांडण्यासाठी महिलांना आणखी बराच काळ प्रतिक्षा करावी लागली असती. महिला, दलित, शोषीत आणि वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी उभे आयुष्य खर्ची घालणाऱ्या फुले दाम्पत्यास भारतरत्न जाहीर व्हायलाच हवा. सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून मी या ब्लॉगच्या माध्यमातून सर्वांना यासाठी एकत्र येण्याचे आवाहन करते. या मागणीसाठी देशातील, किमान महाराष्ट्रातील तरी सर्वपक्षीय खासदार एकत्र येतील अशी मला आशा आहे.

– सुप्रिया सुळे, खासदार

3 thoughts on “क्रांतीचे अग्रदूत

 1. अकुंशराव बबनराव प-हाड, उपसरपंच श्रीक्षेत्र केंदुर
  March 10, 2018 at 12:30 pm

  एकदम सुंदर लेख

  Reply
 2. मनिषा गिरी
  March 12, 2018 at 3:03 pm

  रास्त मागणी.

  Reply
 3. akash kashid
  April 13, 2018 at 9:48 pm

  khup chan tai

  Reply

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading